Ladka Bhau Yojana : लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज कुठे करावा? पात्रता अन् निकष काय? कोणाला किती पैसे मिळणार? जाणून घ्या सविस्तर!
Ladka Bhau Yojana Maharashtra 2024 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यशस्वीतेनंतर राज्यात लाडका भाऊ योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेविषयी सविस्तर जाणून घेउया.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून तुफान प्रतिसाद मिळत आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याकरता अनेक अडचणी येत असल्या तरीही या अडचणी दूर करून महिलांच्या आर्थिक उन्नतीकरता मोठ्या प्रमाणात अर्ज भरून घेतले जात आहेत. दरम्यान, राज्यातील महिलांची आर्थिक अडचण दूर करताना राज्यातील बेरोजगार तरुणांसाठीही सरकारने युवा कार्य प्रशिक्षण योजना कार्यान्वित केली आहे. याच योजनेला माझा लाडका भाऊ योजना असं संबोधलं जात आहे.
लाडकी बहीण योजनेवरून राज्य सरकारवर टीका करताना राज्यातील भावांनी काय गुन्हा केलाय? असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला होता. त्यामुळे लाडका भाऊ योजनाही अंमलात आणली असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात जाहीर केलं. त्यामुळे माझा लाडका भाऊ योजना नेमकी कोणती असा प्रश्न उपस्थित झाला होता. माझा लाडका भाऊ योजना म्हणजेच युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे. राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण, त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ महाराष्ट्र शासनाने २०२४-२५ या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यास मान्यता दिली आहे. या माध्यमातून उद्योजक, खासगी क्षेत्रातील आस्थापना, सेवा क्षेत्र, केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय, निमशासकीय आस्थापनांना मनुष्यबळ मिळणार आहे.
कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्य विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे लाडका भाऊ योजना म्हणजेच युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविण्यात येणार आहे.
उमेदवाराची पात्रता (Candidate Eligibility for Ladka Bhau Yoajan )
- किमान वय १८ व कमाल ३५ वर्षे असावे.
- किमान शैक्षणिक पात्रता १२ वी पास, आयटीआय, पदवीका, पदवी, पदव्युत्तर असावी.
- शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेस सहभागास पात्र असणार नाहीत.
- उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- त्याचे आधार नोंदणी असावे.
- बँक खाते आधार संलग्न असावे.
- कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करुन रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा.
योजनेचं वैशिष्ट्य काय? (Benefits of Maharashtra Ladka Bhau Yojana)
- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी ५ हजार ५०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
- कार्य प्रशिक्षण कालावधी सहा महिने राहील
- शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे आणि विविध क्षेत्रातील प्रकल्प, उद्योग, स्टार्टअप्स, आस्थापनांनी आवश्यक मनुष्यबळाची मागणी ऑनलाईन नोंदविणे गरजेचे.
- उद्योगक्षेत्रात प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणद्वारे उमेदवारांना रोजगारक्षम करुन उद्योगाकरिता कुशल मनुष्यबळ तयार करणार.
- प्रत्येक आर्थिक वर्षात १० लाख कार्य प्रशिक्षणच्या संधी उपलब्ध
- प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी १ आणि शहरी भागात पाच हजार लोकसंख्येसाठी असे एकूण ५० हजार योजनादूत नेमणार
अर्ज कुठे भरावा (How to Apply for Ladka Bhau Yojana Maharashtra 2024?)
लाडका भाऊ योजना यासाठी इच्छूक उमेदवारांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in/ या संकेतस्थळावर अर्ज करणे आवश्यक आहे.
आस्थापना/उद्योजकासाठी पात्रता (Which Organisation is Eligible for Ladka Bhau Yoajan)
- आस्थापना/उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा
- आस्थापना/उद्योजकाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी.
- आस्थापना/उद्योगाची स्थापना किमान ३ वर्षापूर्वीची असावी.
- आस्थापना/उद्योगांनी EPF, ESIC, GST, Certificate Of Incorporation, DPIT आणि उद्योग आधाराची नोंदणी केलेली असावी.
शैक्षणिक अर्हतेप्रमाणे विद्यावितेन मिळणार
- १२ वी पास – प्रतिमहा विद्याविवेतन ६ हजार रुपये
- आय.टी.आय/ पदविका – प्रतिमहा विद्यावेतन ८ हजार रुपये
- पदवीधर/पदव्युत्तर – १० हजार रुपये
हे विसरू नका
- या कार्य प्रशिक्षणाचा कालावधी फक्त ६ महिने असेल. या सहा महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवारांना या योजनेंतर्गत शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल.
- प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित आस्थापनेकडून प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देण्यात येईल.
- या योजनेच्या प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार संबंधित उद्योग आस्थापना यांना योग्य वाटल्यास आणि उमेदवाराची इच्छुकता असल्यास त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने संबंधित आस्थापना निर्णय घेऊ शकतील.
Post Views: 297