महिलांपाठोपाठ शेतकऱ्यांना खूश करण्याचा प्रयत्न, सव्वा कोटी लाभार्थींना महासन्मान योजनेचा चौथा हप्ता
राज्यातील सुमारे एक कोटीहून अधिक महिलांच्या बँक खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून प्रत्येकी तीन हजार रुपये जमा केल्यानंतर महायुती सरकारने आपला मोर्चा आता शेतकऱ्यांकडे वळविला आहे. त्यानुसार नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या चौथ्या हप्त्यापोटी सुमारे एक कोटी २० लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार याप्रमाणे २०४१ कोटी २५ लाख रुपये जमा करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.
या संदर्भातील शासन निर्णय मंगळवारी निर्गमित करण्यात आला आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर जून २०२३ पासून राज्यात नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आहे. या अंतर्गत प्रत्येक वर्षात पीएम किसानच्या बरोबरीने नमो शेतकरी महासन्मान योजनेतून देखील लाभार्थी शेतकऱ्यांना प्रति वर्ष सहा हजार रुपयांची मदत दिली जाते. या योजनेतून राज्य सरकारमार्फत आतापर्यंत तीन हप्त्यात पाच हजार ५१२ कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना देण्यात आली आहे.